विद्यार्थी सहाय्यक संस्था

विद्यार्थी सहाय्यक संस्थेला सन २००७ साली १०० वर्षे पूर्ण झाली हि गोष्ट आपल्या ज्ञातिबांधवांना निश्चितच अभिमानाची, गौरवाची व भूषणावह अशी आहे. आपली ज्ञातीबांधवांनी शिक्षण घेऊन आपला, आपल्या कुटुंबाचा व पर्यायाने आपल्या समाजाचा उत्कर्ष साधावा या सद्हेतूने, आपल्या दृष्ट्या समाजधुरिणांनी स्थापना केलेल्या संस्था विद्यार्थी सहाय्यक संस्थेत विलीन झाल्या असून, अनेक समाजबांधवांनी आपल्या शिक्षणासाठी, या संस्थेकडून आर्थिक सहाय्य घेतले आहे. छोट्या छोट्या निर्झारांचे आज एका मोठ्या जालौघात रुपांतर झाले असून, देवरुखे ब्राह्मण समाजातील ही एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था दिवसेंदिवस प्रगती पथावर वाटचाल करीत आहे. आपल्या समाजातील, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत विखुरलेल्या विद्यार्थी वर्गास संस्थेकडून सतत सहाय्य दिले जात असल्याने, समाज बांधवाना या संस्थेबद्दल खूप आस्था, आपुलकी व प्रेम आहे.

शिक्षणासाठी आर्थिक मदत देत असतानाच, संस्थेबद्दल नितांत जिव्हाळा वाटणाऱ्या, देवरुखे ब्राह्मण समाजाच्या अनेक दानशूर ज्ञातिबांधवांनी आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ, शिष्यवृत्या व पारितोषिके देण्यासाठी भरीव देणग्या दिल्या आहेत व त्यावर मिळणाऱ्या व्याजातून बुद्धिमान व गुणवंत विद्यार्थांना बिना परतफेडीच्या शिष्यवृत्या व पारितोषिके दिली जातात.

सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सव व शतक महोत्सव अशा महत्वपूर्ण टप्प्यांवर संस्थेने नेत्रदीपक समारंभ साजरे केले.

याशिवाय गेली ३० वर्षे संस्थेतर्फे दरवर्षी विद्यार्थी संमेलन भरवण्यात येते व त्यावेळी विविध अभ्यासक्रमात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात येतो. विद्यार्थ्यांचे कौतुक हा एक आनंदाचा सोहळा असतो. पालक वर्गाला नेहमीच स्फूर्तीदायक वाटतात. ज्ञातिबांधव या संमेलनाची उत्सुकतेने वात पाहत असतात हेच या संमेलनांचे वैशिष्ट्य.

विद्यार्थी संमेलनात, जानकीबाई भार्गव मुळे व विद्यार्थी सहाय्यक संस्था यांच्या विद्यमाने ज्ञातीतील विविध क्षेत्रात सुयश प्राप्त करणाऱ्या कलाकारांचा विशेष पारितोषिक देऊन आदरसत्कार  करण्यात येतो.

मुंबई व उपनगर (विरार, कसारा-कर्जत पर्यंत) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्थेतर्फे विनामूल्य पुस्तक पेढी चालवली आहे. या पेढीचे कार्य बहुदा विद्यार्थीच करतात हि उल्लेखनीय बाब आहे.

 उपरोक्त ओल्लेख केलेल्या मदतीचा/ उपक्रमांचा लाभ देशाच्या कानाकोपर्यातील विखुरलेल्या तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या अथवा तेथे स्थायिक झालेल्या आपल्या ज्ञातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतला व ते जेव्हा या संस्थेकडून मी मदत घेतली आहे, या संस्थेचा मी ऋणी आहे असे धन्योद्गार काढतात तेव्हा सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून येतो.

संस्थेच्या द्वितीय शतकामध्ये देवरुखे ब्राह्मणांच्या भावी पिढीपुढील आव्हाने पेलण्यासाठी त्यांना सक्षम करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे.

संस्थेच्या सध्याच्या उपक्रमांची मुहूर्तमेढ शतक महोत्सवी वर्षात रोवली गेली आहे.  या सर्व उपक्रमांसाठी, किमान एक कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट, संस्थेला कमीत कमी वेळात पूर्ण करायचे आहे. शिक्षणाच्या वाढत्या गरजा, विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ व घटणारे व्याजदर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, आपल्याच भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी समस्त ज्ञातिबांधवांनी सढळ हाताने देणग्या देऊन संस्थेच्या ध्येयपूर्तीस असे विनम्र आणि कळकळीचे आव्हान संस्था करत आहे.

चिंतामण य महाजन

अध्यक्ष

विद्यार्थी सहाय्यक संस्था

कार्यालय:- १०६-हेरंब, २५ए,

                  क्रांतिवीर राजगुरू मार्ग, मंगलवाडी समोर, गिरगांव,

                  मुंबई - ४००००४

                 दूरध्वनी :- ०२२-२३८८१९२०

Visit http://www.dbvss.com/en/